Monday 28 September 2015

प्राणपणानं जपावा प्राण...!

वायु प्रदूषणाचे प्रमाण जगभरात वाढत असून यापैकी 90 टक्के प्रदूषण विकसनशील देशात आहे. पंचतत्वापैकी एक असणारा वायू ज्याला आपण प्राण देखील म्हणतो तो प्राणच यामुळे संकटात आहे. या प्रश्नाकडे सर्वांनी लक्ष देण्याची वेळ आली आहे. याबाबत हा खास लेख.

आपल्या संस्कृतीत ज्याला मान्यता मिळाली ती पंचतत्वे आपल्याला जगण्यासाठी सहाय्य करतात. आपलं शरीर यापासूनच बनलं आहे. पाण्याला आपण जीवन म्हणतो तर वायूला प्राण त्याचं कारण देखील हेच आहे. निसर्गानं दिलेलं हे दान असेल तरच जीवन शक्य आहे आणि याचे संतुलन बिघडले तर त्याचा परिणाम आपल्या आयुष्यमानावर पडतो. याचं संतुलन नसेल तर काय याचं उत्तर विनाश असं आहे. ज्याला आपण प्राण म्हणतो त्या वायूच्या प्रदूषणात वाढ होत आहे यामुळेच जगभरात प्रतिवर्षी 70 लाख जणांना प्राण गमवावे लागतात.

वर्षाला 70 लाखांचा हा आकडा खूपच मोठा आहे. त्याहीपेक्षा धोकादायक बाब कोणती असेल तर अशा मृत्यूपैकी 90 टक्के मृत्यू हे विकसनशील देशात होत आहेत. आपल्याकडे महानगरामध्ये असणारी वायू प्रदूषणाची समस्या आता छोट्या शहरांपर्यंत पोहोचली आहे. आपली बदललेली जीवनशैली याला कारणीभूत आहे. धोक्याच्या या नाटकाची ही पहिली घंटा आहे. आताच लक्ष दिले नाही तर येणाऱ्या काळात हे प्रमाण वाढत जाणार आहे.

सुखवस्तूपणानं राहायला शिकवणारी जीवनशैली शहरी भागात वाढत आहे त्यात सहज वित्तपुरवठा करणाऱ्या कंपन्या आणि वाहन उत्पादकांची बाजारी अर्थव्यवस्था यामुळे शहरात वायू प्रदूषण वाढत आहे. ग्रामीण भागात याच्या नेमकी उलट स्थिती आहे. इथं घराघरात इंधन म्हणून जळाऊ लाकडांचा वापर केला जातो. जागतिक आरोग्य संघटनेने केलेला 2012 सालच्या एका अभ्यासात असेही स्पष्ट झाले की, घराबाहेरील वायू प्रदूषणाने होणाऱ्या मृत्यूपेक्षा घरातील प्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या अधिक आहे.

आपल्या देशाची राजधानी असणाऱ्या नवी दिल्ली शहराचे रुपांतर वायू प्रदुषणाच्या राजधानीत झालेले आहे. ही सर्वांसाठी चिंतेची बाब आहे. रस्त्यांवर असणारी वाहनांची वाढती संख्या केवळ अपघात आणि त्यामुळे होणारे मृत्यू याला कारणीभूत नाही तर वायू प्रदूषणाच्या रुपाने दिल्लीत राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्याच्या समस्येस कारणीभूत ठरली आहे. वाहनांमधून केवळ कार्बनडाय ऑक्साईडचे उत्सर्जन होते असे नाही तर शिसं, झिंक आदींची घातक संयुगेही त्यातून बाहेर पडतात. या वायूप्रदूषणासोबत ही वाहने ध्वनीप्रदूषणाची समस्याही निर्माण करतात ती डोकेदूखी वेगळी आहे.

ही समस्या केवळ दिल्लीचीच नाही तर मुंबई, कोलकाता, चेन्नई या महानगरांमध्ये देखील ही समस्या तितकीच गंभीर आहे. पुणे, नागपूर आणि औरंगाबाद सारख्या शहरांमध्येही ही समस्या गेल्या काही वर्षात वाढली आहे. या शहरांमध्ये हमरस्त्यालगत घर असणे म्हणजे आरोग्य समस्यांना आमंत्रण देणे होय. या प्रदुषणाचा सर्वाधिक परिणाम लहान मुलांवर होत आहे. औद्योगिकरण व त्यामुळे वाढणारे शहरीकरण यामुळे ही वायुप्रदूषणाची समस्या दर दोन वर्षाला दुप्पट या गतीने विस्तारत असल्याचे अभ्यासात आढळून आले आहे. वायू प्रदुषणाची भारतातील सर्वात मोठी दुर्घटना 2 डिसेंबर 1984 रोजी झाल्यानंतर आपल्याकडे यावर चर्चेला सुरुवात झाली. मध्यप्रदेशातील भोपाळमध्ये युनियन कार्बाईड या कारखान्यातून मिथेन आयसो सायनाईड वायुची गळती झाली होती. अधिकृत आकडेवारीनुसार 5 लाख 58 हजारांहून अधिक जणांना याची बाधा झाली ज्यापैकी 3787 जणांचा 24 तासात मृत्यू झाला. नंतरच्या कालावधीत बाधितांपैकी 16 हजार जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला असा दावा करण्यात येतो. सुमारे 3900 जणांना यामुळे कायमस्वरुपी अपंगत्व आले.

रासायनिक कारखान्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा सुद्धा या घटनेने ऐरणीवर आला. आज शहरामध्ये वाहनांमुळे जे वायू प्रदूषण होत आहे ते याही पेक्षा घातक म्हणावे लागेल. प्रदूषणाचा आणखी एक घटक आहे तो धुम्रपानाचा. भारतात धुम्रपान करणाऱ्यांची संख्या देखील धक्कादायक अशीच आहे.

जगात धुम्रपान करणाऱ्या व्यक्तींपैकी 12 टक्के या आपल्या भारतातील आहेत, असे जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या अहवालात म्हटले आहे. धुम्रपानामूळे भारतात दरवर्षी 9 लाख लोकांना प्राण गमवावे लागतात. धुम्रपान करणारी व्यक्ती स्वत:लाच इजा करते असे नाही तर त्याच्या आसपासच्या व्यक्तींच्या आरोग्यालाही (Passive Smokers) त्यांच्यामुळे धोका निर्माण करतात. यामुळेच सरकारने 2 ऑक्टोंबर 2008 रोजी गांधी जयंती दिनी सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्यावर बंदी घातली. समस्येचा विचार करताना त्याबाबत उपाय काय करता येतील याचाही विचार व्हायला हवा. यात सर्वात प्रभावी उपाय आहे तो सार्वजनिक परिवहन व्यवस्थेचा. मुंबइचं धावण हे लोकलवर आहे त्यामुळे लोकलचा प्रवास उत्तम. त्यासोबतच बस आणि वाहनांचं शेअरिंग या माध्यमातून प्रत्येकाने प्रदूषण कमी करण्यासाठी योगदान देणे आवश्यक ठरते. धुम्रपान हे आरोग्यास घातक असल्याने त्याचा सार्वजनिक ठिकाणी वापर करण्यास प्रतिबंध आहे. याचा प्रभावी अंमलबजावणी आवश्यक आहे.

वायू प्रदूषणाचा धोका कमी करायचा तर प्राणवायूची निर्मिती वाढली पाहिजे. यासाठी शहरीकरण अपरिहार्य मानले तरी त्या शहरात हरित पट्ट्यांच्या रुपाने झाडे लावून आपण काही प्रमाणात यावर मात करु शकतो. केवळ जंगलांचे रक्षण महत्त्वाचे आहे असं नव्हे तर शहरात मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड आणि त्यांचे संवर्धन आवश्यक आहे. आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेला हा वायू अर्थात प्राण आपण देखील तितक्याच प्राणपणाने जपला पाहिजे. त्यात मोलाची भर घालून पुढच्या पिढीकडे दिला पाहिजे हे आपणा सर्वांचेच कर्तव्य आहे.

-प्रशांत अनंतराव दैठणकर
9823199466

No comments:

Post a Comment